Sunday 26 July 2020

बाजींद कादंबरी मराठी ब्लॉग

"बाजिंद"
भाग 1
"बाळ्या"

.............................
लेखक/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
.................................
रायगड च्या डोंगरदरीत "धनगरवाडी" हे खुप जुने गाव.
सखाराम चा जन्म याच गावचा.
शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला आणि आसपास च्या छोट्या छोट्या खेड्यांचं सोनं झाला.
जीवन स्थिर झालं.
नाहीतर कोण कुठला विजापूर,दिल्लीचा बादशहा कुठल्या सरदाराला पाठवून गावाची राखरांगोळी करेल सांगता येत नव्हते.
रायगड किल्ल्यावर "टकमक" टोक नावाचा एक प्रचंड सुळका आहे,या सुळक्यापासून खाली हजारो फूट खोल दरी असायची.
स्वराज्याशी हरामखोरी करणारे फितूर याच टोकावरुन खाली पाताळात ढकलून दिले जायचे.
टकमकाच्या बरोबर खाली बाजूच्या 10 कोसावर दाट जंगलात धनगरवाडी हे गाव.
स्वराज्याशी फितुरी करणारे हरामखोर टकमकावरून खाली फेकले जायचे तेव्हा हजारो फूट खाली धनगरवाडी जवळ पडायचे.
अक्षरश चिखल व्हायचा त्यांच्या देहाचा..!
काही दिवस कोलह्या कुत्र्यांची मेजवानी झाली,पण जंगली जनावरांचा सुळसुळाट झाला त्या मुळे..!
जंगलातील जनावरं माणसाच्या रक्ताला चाटवली आणि मग जेव्हा टकमकावरून कोणी हरामखोर खाली येईना,त्यावेळी भुकेने कासावीस असणारी जनावरे शेजारच्या धनगरवाडीत हल्ले करु लागली..!
शे दोनशे घरट्यांचे गाव त्यामुळे भयभीत झाले.
मग गावचा कारभारी असलेला सखाराम हे गाऱ्हाणे घेऊन रायगडावर सरकारी दफ़्तरी सांगायला जायला निघाला.
सोबत पाच दहा जोडीदार सोबत घेऊन दिवस उगवायला घरातून बाहेर पडायच्या बेतात होता.
सखाराम च्या दोन बायका होत्या,राधिका आणि अंबिका.
दोघींचा पण सखाराम वर जीव होता.
राधिकेला मूल बाळ नसल्याने पाचाड पलीकडच्या धनगरवाडी वरच्या नातलगांची मुलगी अंबिका त्या घरात सखाराम ची कारभारीन बनून आली.
अंबिका ला मुलगा झाला.
वंशाला दिवा झाला म्हणून आवडीने बाळकृष्ण नाव ठेवले.
शिवाजीराजे रायगडावर राज्याभिषिक्त झाले त्याच दिवशी बाळकृष्णाचा जन्म झाला म्हणून सारी धनगरवाडी हरखून गेली होती.
बाळकृष्णाला बाळ्या म्हणून सगळी हाक मारत होती.
बघता बघता बाळ्या 7-8 वर्षाचा झाला होता.
बाळ्याचे वडील सखाराम अंगापिंडांने मजबूत गडी.
शेजार च्या वाड्या वस्त्यात सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सखाराम कारभारी म्हणूनच काम करत होता.
गावातील सारे लोक धनगर.
मेंढ्या,शेळ्या चरायला नेणे,कोंबड्या पाळणे,जंगलातून लाकूड तोडून आणणे हा सर्वांचा प्रमुख उद्योग.
गावातल्या ज्या कुटुंबाकडे शेळ्या मेंढ्या जास्त तो गावचा सावकार माणूस.
सखाराम कडे 700 मेंढ्या,300 शेळ्या आणि 200 कोंबड्या होत्या.
सर्वात जास्त जीतराप असल्याने तो गावचा सावकार पण होता.
पण गेल्या 5-10 वर्षात बादशाही आक्रमणे महाराजांच्या मुळे बंद झाली,पण टकमक वरुन खाली येणारी मढी हे नवे दुखणे रायगड परिसराला जडले होते.
वर स्वर्गात डोके खुपसून महाराष्ट्राला सुखी करणारा रायगड,खाली मात्र नरक यातना देत असे.
कित्येक वेळा अनेकांनी रायगड वर जाऊन ही बातमी सांगितली होती,पण दखल घ्यायलाच कोणी नव्हता,म्हणून सखाराम हे गाऱ्हाणे घेऊन खुद्द महाराजांना भेटायला निघाला होता.
त्याचे कारण पण गंभीर होते...!
"पावसाळा नुकताच संपला होता,सारा रायगड परिसर हिरवागार शालू नेसून नटल्यासारखा झाला होता.
जनावरांना खायला प्यायला वैरण पाणी मोप मिळत होते.
सखाराम चा बाळ्या सकाळी उठून टकमकाच्या खाली शेळ्या घेऊन जायला निघाला होता.
सखाराम ने त्याच्या सोबतीला घरचा नोकर पांडू ला पाठवून दिले..!
परवाच्या मध्यरात्रीला टकमकाच्या बाजूने एका माणसाच्या जिवाच्या आकांताने किंचळण्याच्या आवाजाने सारा वाडा जागा झाला होता.
अजून एक मराठेशाहीचा फितूर,गद्दार बहुतेक टकमकवरून खाली आला असणार हा अंदाज सर्वांनी बांधला होता,सकाळी जाऊन सखाराम पाहून आला होता,पण ते मढ कुठं नजरेस पडलं नव्हतं.
त्या दिवशी बाळ्या शेळ्या हिंडवायला गेला होता,माघारी येता येता संध्याकाळ होत आली आणि दाट जंगलात भुकेने व्याकुळ दोन बिबळ्या वाघ ते परवाच मढ तोडून खात होते,हे दुरुनच पाहून बाळ्याला घेऊन पांडू वाड्याकडे धावत सुटला,तितक्यात एका फांदीला पाय अडकून पांडू खाली पडला आणि मावळतीच्या बाजूला एक काळाकिभिन्न मनुष्य हातात मजबूत काठी घेऊन,गळ्यात चांदीची पेटी घालून पांडू आणि बाळ्या कडे पाहून हसत उभा होता...!
••● क्रमश :

बाजिंद’

भाग २ रा 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लेखक/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पांडू आणि बाळ्या धडपडत उठले.
शेळ्या,मेंढ्या तिथेच सोडून जीवाच्या आकांताने धावू लागले.धापा टाकत ते वाड्यात पोहोचले आणि जोरजोरात सखाराम कारभाऱ्याला हाक मारू लागले .
त्यांचा आरडाओरडा ऐकून सारे गाव एकत्र जमा झाले.घडलेली हकीकत त्यांनी सखाराम ला सांगितली.
सखाराम आणि गावकार्यांनी आता हि गोष्ट रायगडावर जातीने सांगून याचा बंदोबस्त केला पाहिजे असे मनोमन योजले होते.
सर्व गावकर्यांच्या मनात भीतीने काहूर माजले होते.काहीही करून या जनावरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे असे सर्वाना वाटले.
रात्री झोपताना बाळ्या अंबिका आईला घडलेली सर्व कहाणी सांगू लागला,आणि सांगता सांगता त्याला एकदम आठवले कि आपण जिथे फांदीत पाय अडकून पडलो होतो तिथे एक काळाकभिन्न माणूस आपल्याकडे पाहत उभा होता.
त्याने हि हकीकत सखाराम ला सांगितली.
निर्मनुष्य टकमक दरीच्या खाली,आपल्या वाड्यावरच्या मेंढपाळ गड्याव्यतिरिक्त दुसरा मनुष्य कसा येऊ शकतो याचे सर्वाना नवल वाटले.
असेल कोण तरी गुराखी,जो वाट चुकून तिथे आला असावा असे म्हणत सखाराम ने विषय टाळला आणि सकाळीच रायगड च्या वाटेला निघायचे असे ठरवून सोबत कोणाकोणाला न्यायचे हे जाहीर करत सर्वाना तयारीचे आदेश दिले.
वाड्यावरचे सखाराम चे लहानपणाचे मैतर मल्हारी,सर्जा आणि नारायण याना घेऊन जायचे नक्की केले.
तिघेही अंगाने मजबूत आणि एका विचाराचे होते.सखाराम वर त्यांचा फार जीव होता.सर तयारी झाली आणि ती रात्र भूतकाळात जमा झाली.
सकाळच्या पहिल्या प्रहरी कोंबड्याने पहिली बांग दिली.
सखाराम च्या दोन्ही कारभारनी लौकर उठून स्वयंपाकाला लागल्या.
पहाटेच्या धुक्यात रायगड खूपच सुंदर दिसत होता.टकमकापासून वरचा सारा भाग धुक्यात झाकून गेला होता.
दुरून पहिले कि एखादा पैलवान कानाला पांढरी कानटोपी घालून बसल्या बसल्या गुडघ्यात मान खुपसून डुलकी मारत आहे असा भास होत होता.
राधिका आईने कोंबड्याची डालगी (खुराडी) चे झाकण काढले आणि आत विसाव्या घेणाऱ्या कोंबड्या बाहेर पडल्या..आणि मग त्या कोंबड्यांचे आवाज ऐकून गावातील इतर घरातील खुरुडे जोरात ओरडू लागली.
सखराम ने भरडलेल्या नाचणीच्या पोत्यातून काही नाचणी काढून अंगणात टाकली तशी कोंबड्यांचे थवे त्यावर तुटून पडले.
लहान लहान कोंबड्या तर सखाराम च्या खांद्यावर,डोक्यावर बसल्या.सखाराम ने त्या बाजूला करत अजून काही नाचणी टाकली.
समोरच्या शेळ्यांच्या कुंपणात शेळ्या,मेंढ्या सुध्दा आशेने त्याच्याकडे बघत होत्या.
समोर असलेली गवताची गंजी सोडून त्यांच्याही चारा पाण्याची सोय केली.
गोठ्यातला गाई,म्हैशी,बैल सर्वाना चारा टाकला.
एव्हाना तांबड फुटायला लागले होते.
सोबत येणारे मैतर अंगावर घोंगड,खायला भाकर्या बांधलेली झोळी आणि कुर्हाड घेऊन सखाराम च्या दारात हजर झाली.
सखाराम ने न्याहारी आटपली आणि कपाळाला भंडारा लावत त्या साथीदारांच्या कपाळी सुधा भंडारा लावला आणि राधिका,अंबिका ला सांगून जायला निघाले.नारळाच्या काथ्यापासून बनवलेले जाड गोणपाट निमुळते करत पावसापासून वाचण्यासाठी त्याचे गोंचे करून चौघांनी डोक्यावर घेतले होते.
एव्हाना बारीक रिमझिम पाउस सुरूच होता.
सोबत असावा म्हणून एक घोडा चौघात घेतला आणि त्यावर आणलेले जेवणाची थैली बांधत सखाराम ने एकवार टकमक टोकाकडे पाहिले.
सखाराम ला आठवले कि शेवटच्या वेळी ‘शिवाजीराजे भोसल्यांच्या’ राज्याभिषेकाला रायगडावर जाऊन खुद्द महाराज पहिले होते.
सरसर भूतकाळ त्याच्या नजरेपुढे येऊ लागला.
आजवर ज्याच नुस्त नावच ऐकून लहानाचा मोठा झालो तो शिवाजी त्या दिवशी राजा झाला होता.
जावळीच्या मोरे आणि पुण्याच्या भोसल्यांच्या दंग्यात रायरी परिसर एककाळी हादरून गेला होता.महाबळेश्वर पासून ते महाड पर्यंतचा पूर्ण दाट जंगल जाळीचा पट्टा जावळीकर मोऱ्यांच्या ताब्यात होता.काय घडले देव जाणे पण एके दिवशी भगवे झेंडे घेतलेले हजारो हशम रायगडला भिडले आणि तेव्हापासून ते आजवर कधीही रायगड परिसराला अवकळा लागली नव्हती.सर्व काही आनंदात होते.
महाराजांनी पाण्यासारखा पैसा ओतून हा रायरीचा किल्ला ‘रायगड’ केला होता.
त्यावेळी आमच्या वाड्यानेच जंगलातल्या वाटा,चोरवाटा महाराजांच्या फौजेला दाखवून दिल्या होत्या.
आणि एक दिवस महाराज राजे झाले होते.
मुठीत मावेल तितके सोन महाराज सर्व रयतेला वाटत होते..एक नाहीतर दोन क्षण त्या महाराष्ट्राच्या महादेवाचे दर्शन झाले होते..!
टकमकाकडे पाहत सखाराम हे सारे आठवत होता.
सर्वजन जायला निघाले.
वाड्यापासून टकमकाच्या खालूनच रायगडाच्या ‘चीत’ दरवाज्याकडे जायला वाट होती.वाटेत महाराजांचे मोर्चे,मेटे होतेच,पण ह्या असल्या मुसळधार पावसात तिथ कोण असेल का नाही सांगता येणार नाही.
मल्हारी,सर्जा,नारायण आणि सखाराम हे चौघे त्या वाड्यातून चालू लागले.
वर रिमझिम पाउस होता ,पण गोंच्यामुळे डोक्याला न लागला बारीक तुषार तोंडावर पडत होते.
जेवण भिजू नये म्हणून त्यावर घोंगडे टाकले होते.
मल्हारी ने घोड्याचा लगाम पकडला होता आणि हे चौघे चिखल तुडवत टकमक दरीकडे चालत जात होते.
साधारण दोन प्रहर चालून झाले.सूर्य चांगलाच वर आला होता.
१-२ कोसावर टकमक दरी येईल असा अंदाज लागला आणि चौघांच्याही अंगावर शहरा आला.
एक प्रकारची अनामिक भीती होती मनात.
आजवर इतकी माणसे वरून खाली आली ,काय झाले असावे त्यांचे ?
माणूस मेल्यावर नक्की जातो कुठे ...आणि इतक्या वरून पडल्यावर किती बेकार जीव जात असल एकेकाचा..!
चोघांच्याही डोक्यात अनामिक भीती होतीच....आणि तितक्यात टकमकावरून आणखी एक आकाशपाताळ भेदणारी जीवघेणी किंचाळी ऐकू आली..!
चौघेही सावध होऊन वर पाहू लागले तर त्याना दिसले कि टकमकावरून आज आणखी कोणाला तरी कडेलोट झाली आहे..!
भीतीने सर्वांग थरारून उठले होते....कमी आवाज...हळूहळू मोठा झाला आणि अवघ्या काही अंतरावर धड्ड असा आवाज करत जंगलाच्या दाट जाळीत ते मढ पडलं आहे याचा चौघानाही अंदाज आला.....चौघेही एकमेकाकडे पाहू लागली.
खूप विचार करून उसन्या आवसानान सखाराम बोलला.....गड्यानो...आपण ते कोण आहे बघून येउया का र...?

••● क्रमशः ●••

धन्यवाद

लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या




"बाजींद"

भाग 3 रा

••••••••••••••••••••••••
लेखक/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
••••••••••••••••••••••••••••

मल्हारी,सर्जा आणि नारायण प्रश्नार्थक मुद्रेने सखाराम कडे पाहू लागली.
सारा गाव ज्या गोष्टीमुळे गेली 5-6 वर्षे भीतीच्या दडपणाखाली आहे,त्या गोष्टीजवळ येऊन हा माणूस त्या गोष्टीला जवळून पाहूया कसा काय म्हणत असेल हा प्रश्न तिघांना पडला होता.

सखाराम ने तिघांच्याकडे पाहत उचश्वास टाकत बोलला..!

अरे आजवर घर-संसार पाहतच आलोय आपण,देवाच्या दयेने आसपास च्या बारा वाड्यात चांगलं नाव हाय आपलं.
ही असली मेलेली मढी किती दिस भ्या घालणार आपणाला.
हे बगा, खंडोबाचा भंडारा लावलाय आपण भाळाला, जरा धीर धरुन ती मढ बघुया,म्हणजे वर गडावर गेल्यावर बोलायला तोंड मिळलं आपणाला,राजा देवमाणूस हाय आपला,आपल संकष्ट नक्की त्यांच्या ध्यानी येईल...चला,खंडेरायाच नाव घ्या आणि या माझ्या मागं...!

सखाराम च्या असल्या बोलण्याने तिघांनीही धारिष्ट्य केले आणि मान हालवून टकमक दरीकडे पाय वळवले.

एव्हाना रिमझिम पाऊस थांबला होता,आणि कोवळे उन्ह अंगावर पडू लागले होते.
घोड्याला पण उन्हामुळे चांगली उब मिळत होती,तो पण मनोमन सुखावला होता.
रायगड ची उंची स्वर्गाला भिडली होती.
वर पडलेला पाण्याचा थेंब न थेंब सरळ खाली येत होता.
त्यामुळे वरुन धबधबणारे पाणी ओढ्यात मिळून छोटे छोटे नाले तुडुंब भरुन वाहत होते.
पायात कातडी पायतान पाण्याने आणि चिखलाने जास्तच जड झाल्याने चौघांनी ते काढून मधोमध कासरा बांधून घोड्याच्या पाठीवर बांधले आणि एका मोठ्या चिंचेच्या झाडाला घोडा बांधून,कुऱ्हाडी आणि घोंगडे अंगावर घेऊन ते ओढ्यातून वाट काढत टकमक दरीकडे निघाले.

चौघेजण ओढ्यातून पुढे पुढे जाऊ लागले,चांगले मध्यावर गेले आणि चिंचेला बांधलेला घोडा दोन्ही पाय वर करत जोरजोराने किंचाळू लागला..!
काय होतय चौघांना कळेना,आसपास पहिले तर गार वाऱ्याशिवाय चिटपाखरु पण नव्हतं..मग ह्येला काय झाले ओरडायला समजेना...!

त्याने हिसका मारुन लगाम,दावे तोडले आणि सुसाट वेगाने बाजूच्या जंगलात पळून गेला..!

घोड्याच्या या विलक्षण वागण्याने नारायण मात्र पुरता घाबरला,तो म्हणाला ..."गड्यानो, मला काय लक्षण ठीक दिसणा...माझा घोडा आजवर असा कवाच वागला नाय...माझं ऐका,मागं फिरुया..चार दोन दिसान पाचाड ला सांगावं धाडून सगळी हकीकत महाराजांच्या खासगीत सांगूया...पण आत्ता बाहेर पडूया...!

सखाराम त्यावर रागात बोलला..."महाराजांची खासगी तुझ्यासारख्याच ऐकून घ्यायलाच बसली हाय जणू...सारा महाराष्ट्र सांभाळायचा हाय त्यास्नी...तुझ्या घोड्यान साप-पान बघितलं असलं म्हणून तो गेला पळून... दरीकड जाऊन लौकर मागं येऊन त्याला शोधूया...चला पाय उचला लौकर...!

सारे जण त्या भयाण ओढ्यातून पुन्हा चालू लागली.
चांगलं छातीपर्यंत पाणी आलं आणि पाण्याचा जोर जाणवू लागला.
चौघांनी एकमेमेकांना हात देऊन कड केलं..!
ओढ्याच्या बरोब्बर मध्यावर आलं तस वाघांच्या एका गगनभेदी किंचाळीने पावसाने गारठून अंग चोरून बसलेली चिमणी पाखर आभाळात उडू लागली आणि चौघांच्या अंगावर भीतीने शहारे आले....ओढ्याच्या पाण्याच्या वेगाने ते एकसारखे वाहू लागले आणि चौघांची हाताची कडी तुटली आणि ते उत्तरेकडे वाहू लागली...!
जो तो आता जीव वाचवायचा प्रयत्न करु लागला..!

मल्हारी पूर्वी महाड ला सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या तालमीत 3-4 वर्षे राहून आलेला गडी होत.
सिंहगड लढाईत सुभेदार गेलं आणि तालमीतल्या पैल्वाणांच्या वर उपासमारी आली..म्हणून चौघांनी पण कुस्तीला रामराम ठोकून गाव गाठला होता.
पण त्या कुस्ती मुळे पुरात पोहायचे कसे त्यांला चांगलेच ठाऊक होते,त्याने सर्वाना ओरडून सांगितले की काठावर असलेल्या वडाकडे बघत पोहा....!

पुरात जर फसला तर हात पाय हलवून काय उपयोग नसतो..अश्यावेळी एक करायचं की काठावर असलेलं कोणतही मोठं झाड त्याकडे लक्ष देत तिरकस पोहत पोहत जायचं...पाण्यात साप,विंचू,काटे काहीही येवो लक्ष द्यायचे नसते...चौघेही पुराची धार तोडून एका महाकाय वडाच्या झाडाजवळ पोहोचले...!

चिंब भिजलेल्या चौघांच्या कुऱ्हाडी पाण्यात वाहून गेल्या होत्या.
घश्यात पाणी गेले होते त्यामुळे चौघेही ठसके देत देत काठावर दम खात पहुडले होते...!

साधारण दम कमी कमी झाला आणि सखाराम क्षणात सावध झाला आणि मल्हारी,नारायण,सर्जा कुठे आहेत पाहू लागला..!
हाकेच्या अंतरावर तिघेही दम खात पहुडले होते.
सावकाश पावले टाकत तो तिघांच्या जवळ जाऊन तिघांना सावध केलं..!

नारायण,दम खात बोलला...तुम्हाला म्या सांगत हुतो,आरं जनावरं ते बघू शकट्यात जे तुम्हाला आमाला दिसत नसतया... खण्डेरायचा आशीर्वाद म्हणून वाचलो,पण आता हिकडं वाघाची डरकाळी ऐकली नव्ह...आता काय करायचं...?

सखाराम ने धीर देत त्याला सांगितले,अरे नको काळजी करु.. या सगळ्या भाकडकथा आहेत.
तस जर नसत तर 350 वर्षे महाराष्ट्र गुलामगिरीत राहिलाच नसता...देव देवरस पण काय कमी होत काय आपल्याकडं....पण शिवाजीराजानं तलवारीच्या जोरावर संपवलीच ना गुलामगिरी...पण विचारांची गुलामगिरी कवा संपणार आपली देव जाणे...चला धीर धरा...वाड्या जवळची हजारो घरटी आपल्या चौघांच्या नजरेला नजर लावून बसली असतील...या असल्या फालतू गोष्टीत भिऊन बसला तर शेण घालतील लोकं आपल्या तोंडात..उठा बिगीन आणि चला...!

सखाराम च्या निर्वाणीचा बोलणे तिघांनाही ऊर्जा मिळाली,चौघेजण पुढे चालू लागले...!

तो महाकाय वडाचा बुंधा पाहून कोणीही भयकंपित होईल.
त्याच्या त्या विशाल पारंब्या पाहून जणू ब्रम्हराक्षस वाटेत ठाण मांडून बसला असावा असा भास होत होता.

चौघे जण वर टकमक टोकाकडे पाहत दरी कुठे असेल अंदाज बांधत त्या वडाला बगल देऊन चालू लागले..!

ओढ्याच्या काठापासून जंगली भाग फारसा दूर नव्हता,म्हणायला म्हणून ते पठार होते,पण सारी जंगली झाडे फार.
एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता,पण पावसाळी ढगाने इतकी गर्दी केली होती की संध्याकाळ झाल्याचा भास होत होता..!

तिघेही जंगलात घुसणार इतक्यात वाघांची ती प्रचंड डरकाळी समोरच्या झाडा झुडपातून येऊ लागली..!
चौघांची सर्वांगें थरारली.
जंगलातील झुडपे हालवत ती श्वापदे बाहेर पडत होती.
किती होती काय माहित,नक्कीच एक पेक्षा जास्त होती हे नक्की.
आता मात्र सखाराम च्या धीराच्या गोष्टी ऐकण्यात नारायण,सर्जा,मल्हारी तिघांनाही रस नव्हता...आणि त्या गोष्टी सांगायला सखाराम कडेही वेळ नव्हता...आल्या पावली ते वडाच्या झाडाकडे धावू लागली...!

डरकाळी चा आवाज मोठा होत गेला आणि सखाराम चा पाय फांदीत अडकून सखाराम पडला...नारायण ने ते पहिले आणि सर्जा व मल्हारी ला थांबवत त्याला उचलायला गेली तितक्यात ते पावसाने भिजलेले वाघाचे प्रचंड धूड जंगलाबाहेर पडले...त्यापाठोपाठ अजून एक..अजून एक...चौघांची डोळे विस्फारली गेली आणि हात पाय गाळून चौघे बसल्या जागी भीतीने गारठून ओरडू लागली...

किमान 5 ते 6 धिप्पाड वाघ छलांग मारत मारत चौघांचा वेध घेत येत होती...चौघांनी जगण्याचा धीर सोडला आणि डोळे मिटून त्यांचा इष्ट देव खंडेरायचा धावा सुरु केला.....वाघ चवताळत आले...बस्स आता एकच झेप आणि खेळ संपला...तितक्यात.......

सुं.. सुं... सुं.... करत एकापाठोपाठ एक बाण वडाच्या झाडापाठीमागून कोणीतरी सोडले....वाघांचा तो वादळी आवेग आणि वाऱ्यासारखा वेग क्षणात कमी झाला...ते बाण बरोबर सखाराम आणि त्या तिघांच्या पुढे काही अंतरावर जमिनीत घुसले...ज्याने ते बाण सोडले त्याकडे भयभीत नजरेने ते 5-6 वाघांचे प्रचंड धूड पाहत..आल्या पावली वाऱ्याच्या वेगाने पुन्हा जंगलात पळून गेली...!

चौघांनी डोळे उघडून ते पळून जाणारे वाघ पाहिले आणि आश्चर्यकारक नजरेने उभे राहिले व समोर घुसलेल्या बाणाकडे पाहत एकदम मागे फिरले...!

••● क्रमश ●••

धन्यवाद

लेखक/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या



"बाजींद"


भाग 4 था

••••••••••••••••••••
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
●••••◆••••••••●●•••••••••◆••••●

आभाळातून वीज चमकावी तसे ते दोन बाण वाऱ्याच्या वेगाने येऊन समोर जमिनीत घुसले अन जिवाच्या आकांताने ते वाघांचे धूड पळताना पाहून सखाराम व मित्रांना आश्चर्य वाटले.
एव्हाना जिवाच्या भीतीने पळत सुटलेले ते चौघेही जणू काही झालेच नाही अश्या आवेशात उठली आणि आपल्या बचावासाठी एवढया पावसात आणि या दुर्गम जंगलजाळीत कोण आला आहे याचा कानोसा घेऊ लागली.
तो कोणीही असो,त्यांच्यासाठी देवदूत होता.
एक दीर्घ श्वास घेत ते चौघे वडाच्या झाडाकडे पाहू लागले...आणि त्यांना हातात धनुष्य घेतलेल्या एका योध्याचे दर्शन घडले...!

सहा साडेसहा फूट उंच,अनवाणी पण भव्य पाय,दोन्ही पायात काळा दोरा,अंगात धोतर आणि काळा अंगरखा ज्यावर रक्ताचे डाग...गळ्यात चांदीची पेटी लटकत होती.
कमरेला समशेर व पाठीला ढाल होती.
कमरेला पांढरा शेला बांधला होता,डोक्याला मराठी पद्धतीचे मुंडासे व भव्य कपाळावर भंडारा लावला होता..आग ओकणारे लाल भडक डोळे,सरळ सळसळीत नाक,कल्लेदार मिशा....एक विशी पंचविशीत तो तरुण धिप्पाड मल्ल भासत होता...!
चेहऱ्यावर एक प्रकारची गंभीरता स्पष्ट जाणवत आपले भव्य अनवाणी पाय त्या ओढ्याच्या भिजलेल्या मातीवर ताकत तो एक एक पाऊल त्या चौघांच्याकडे येत होता.

चौघांनाही कुतूहल,आश्चर्य,अनेक प्रश्न पडले होते...कोण असावा हा धीरगंभीर पुरुष...!

चौघांनीही धीर एकवटून त्या पुरुषांकडे जायला पावले उचलली आणि तितक्यात आभाळातून सरसर मेघधारा बरसू लागल्या..!

तो धिप्पाड पुरुष तसाच मागे सरकला आणि वडाच्या डोलीत थांबत त्या तिघांनी तिथे येण्यासाठी खुणावले..!

ती खून मिळताच तिघेही धावत त्या डोलीकडे धावू लागली...धावताक्षणी एवढ्या मुसळधार पावसातही वाघांच्या डरकाळ्या मात्र पुन्हा एकदा ऐकू येत होत्या....!

चोघेही त्या युवकाजवळ आले,निशब्द शांतता भंग करत सखाराम त्याला बोलला...!

"पाव्हणं... कुण्या गावचं तुमी ?
लय उपकार झाले बगा तुमचे,माझ्या खंडेरायानेच तुम्हाला हित पाठवलं बगा..तुमचे लय उपकार झाले"
सखाराम च्या शब्दाला मान डोलवत तिघेही सुरात सुर मिसळून मान हलवू लागली..!

क्षणभर शांतता पसरली,अन काही क्षणात त्या युवकाचा धीरगंभीर आवाज ऐकायला मिळाला..."कोण तुम्ही ?
का आला आहात तुम्ही इकडे ?"

निर्धारी प्रश्न विचारत त्याचे ते अंगार ओकणारे डोळे त्या चौघांवर पडले अन चौघांनाही काय बोलावे क्षणभर समजेना...!

आम्ही धनगरवाड्याचे,रायगड ला निघालो आहोत...सखाराम बोलून गेला...!

रायगडी ? कशासाठी ?
क्षणाचाही विलंब करता त्या युवकाने प्रतिप्रश्न केला...!

मग,सखाराम ने त्यांच्या येण्याचे कारण सांगितले.
टकमकावरुन येणाऱ्या मढ्यांच्या मास रक्ताला चाटवलेले वाघ,जनावरे माणसावर हल्ले करत आहेत..सारे पंचक्रोशीतील गाववाले हैराण आहेत या गोष्टीवर...म्हणून आम्ही हे प्रकरण रायगड च्या सरकारी लोकांच्या कानावर आणि गरज पडली तर महाराजांना भेटून सांगायचे म्हणून घराबाहेर पडलो आहोत...!

मूर्ख आहात तुम्ही...मोठ्या आवाजात तो युवक बोलला...तुमची गाऱ्हाणे ऐकायला असे कसेही भेटतील काय सरकारी अधिकारी आणि महाराज ?

आणि रायगड सोडून या दरीत का आलाय मरण्यासाठी ?

त्याच्या या प्रश्नाने नारायण बोलला...आर कोण र तू ?
मगापासून ऐकून घेतोय तुझं..वाघापासून वाचवलं म्हणून तुझं उपकार मानायला लागलो तर आम्हाला कायदा शिकवायला लागलास काय ?
आधी तू सांग कोण आहेस,आणि हे अंगावर रगात कसलं ?

नारायण च्या या बोलण्याने तो युवक थोडा आकसला....!
मोठा श्वास घेऊन बोलला...मी ...मी कोण ?
हाच प्रश्न जन्मापासून स्वतःला विचारत लहानाचा मोठा झालोय....!
अजून उत्तर सापडत नाही,आणि आता सापडून पण उपयोग नाही..!

खंडोजी नाव माझं..!
महाराजांच्या हेर खात्यात बहिर्जी नाईकांच्या समवेत 10 वर्ष काम केलंय... पण...पण आता भटकतोय या दरीत एकटाच..!
वाट बघतोय कोणाची तरी...!

खंडोजी च्या या बोलण्याने चौघेही आश्चर्यचकित झाले..!
चौघांना चूक झाल्याची जाणीव झाली आणि सखाराम ने खंडोजी ला माफी मागत बोलू लागला....

"माफ करा सरकार,आम्ही गरीब लोक,ह्यो नारायण,ह्यो मल्हारी,ह्यो सर्जा आणि आन म्या सखाराम"
मल्हारी पण महाराजांच्या फौजेत जायला गेला हुता सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या तालमीत,पण हत्यारे शिकत व्हता आणि सिंहगड च्या दंग्यात सुभेदार गेलं आण मग ह्यो परत आला गावाकडं...आमची लय इच्छा व्हती की राजांच्या फौजेत सामील व्हावं पण एवढं नशीब कुठलं ओ आमचं...पण खंडेरायाच्या कृपेनं गावगाडा सांभाळतो आमी.. गावसाठीच सरकार ला हे टकमक वरची मढी काढायला कोणाची तरी नेमणूक करा म्हणून आर्जव करायला निघालोय आम्ही...तुम्ही नाईकांच्या जवळचे म्हणजे महाराजांचे पण जवळचेच... आम्ही हात जोडतो एवढं पुण्य घ्या पदरात....आमची गाऱ्हाणी सांगा सरकारी दरबारी..."

चौघांनी खन्डोजी ला हात जोडलेलं बघितलं आणि खन्डोजीने हातातलं बाण खाली टाकत सखाराम चा हात पकडत म्हणाला....नका हात जोडून अजून पापात पाडू मला....आधीच लय पापाचे ओझं घेऊन वावरतोय मी....चला मी तुम्हाला मदत करतो..."

खंडोजी च्या आश्वासनाने चौघांना धीर आला.

खंडोजी म्हणाला...पण गड्यानो..मी फक्त तुम्हाला मार्ग दावीण आणि युक्त्या सांगीन...मी स्वता काय बी करणार नाही...मला कोणीही प्रश्न विचारायचा नाही..मी सांगल तस जर वागायचं वचन देत असशील तर मी नक्कीच या कामात तुम्हाला मदत करीन.."

चौघांनीही होकारात्मक मान हलवली.
खंडोजी ने वडाच्या डोलीत ठेवलेली एक कानाबरोबर उंचीची काठी काढली आणि चौघांकडे पाहत बोलला....चला निघूया, आता जोवर तुमच काम होत नाही तोवर माघे यायचे नाही..."

सखाराम,नारायण,सर्जा,मल्हारी चौघांनाही खंडोजी च्या रुपाने आशेचा किरण दिसू लागला.

ते चौघे खंडोजी च्या पाठोपाठ पावले टाकत त्या जंगलात निघाली..!
एव्हाना पाऊस बंद झाला होता,सूर्य मावळतीला झुकत निघाला होता.
"मंडळी,रात्र होण्याच्या आधी इथून तीन कोसावर एक चोरवाट आहे दाट जंगलात,पण गेल्या 15-20 वर्षात तिकडं कोणी फिरकला नसेल.
आपल्याला रात्र काढायला चांगलं ठिकाण आहे,आजची रात्र तिथं काढूया आणि सकाळी दिवस उगवायला रायगड च्या हमरसत्याला लागूया...!
मोर्चे,मेटे आडवे आहेत,पण तिकडं गेला तर परवाने,ओळख सगळं विचारतील आणि विनाकारण तुरुंगात पण डांबून ठेवतील जर ओळख नाही पटली तर...!
मला ह्यो परिसर घरच्या वाणी आहे,मी तुम्हास्नी निम्म्या वक्तात चित दरवाजा जवळ नेतो...आणि मग पुढ काय करायचं मी संगतोच...चला लौकर पाय उचला...!

खंडोजी तरातरा चालू लागला.पायात पायतान नसताना त्याचा चालायचा वेग बघून चौघेही पाहातच राहिले,त्यांना पायात पायतान असून चालन जमत नव्हतं एवढया वेगाने...!

आणि केवळ अर्ध्या एक तासात एका दाट अरण्यात त्यांचा प्रवेश झाला.इतके दाट की झाडाला झाड लागून असावे इतकी झाडांची गर्दी...!
जमिनीवर लाकडे कुजून काळा थर चढला होता,त्यावरून खंडोजी च्या मागे ते निघाले होते.
त्या भयप्रद जंगलाला बघून मल्हारी बोलला...सखा,लगा हयात गेली मेंढर चरवण्यात इकडं कधी येन झालं नाही,कितीतरी येळा जवळन गेलोय मी,इतकी दाट झाली आईच्यान सांगतो बघितली नव्हती,ही झाडी कशी काय आली असलं इथं ?
गप र...भिऊन काय बी बरळु नको,महाराजांचा हेर आहे खंडोजी, असलं त्याला गुप्तवाट माहिती..चला गुमान.."

जंगलाच्या मध्यावर येताच जंगली किड्यांची किरकिर आवाज अतिशय वाढला,सूर्य मावळातील गेल्याने पुढचं काय दिसत नव्हतं..!
एका पाऊलवाटेने ते चालत होते आणि एका वळणावर खंडोजी बाजूला गेला आणि सखाराम पुढे आला तर खंडोजी कुठे नजरेस पडेना..!
त्याने मागे पाहिले आणि सर्जा,नारायण,मल्हारी ला सांगितले की खन्डोजी कुठे गेला ?
एव्हाना पूर्ण रात्र झाली होती,ते चालत चालत जंगलाच्या मध्यावर एका पडक्या मंदिराजवळ पोहचली.
या इतक्या दाट जंगलात हे मन्दिर कुठले असावे हा प्रश्न चौघांना पडला..!
पावसाने मंदिराच्या शिखरापर्यंत हिरवे शेवाळ दाटले होते,समोर दगडी नंदी सुद्धा पावसाने भिजून त्यावर सुद्धा शेवाळाची हिरवी झालर चढली होती..!

सखाराम म्हणाला...अरे ह्यो खन्डोजी कसा आणि कूट गेला ?
आता र काय करायचं ?
एक काम करुया आजची रात्र या मन्दिराचा आसरा घेऊया आन उद्या आपण आपलं हमरस्ता हुडकून आपल्या मार्गानं जाऊया...!
तिघांना हे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता...!

ते चौघे आत शिरले.
ते प्राचीन दगडी मन्दिर महादेवाचे होते.
कित्येक वर्षे हे दुर्लक्षित असावे असे वाटले,पावसाने पाणी आत थेंब थेंब झिरपत होते..!

नारायण बोलला,चला माझ्या महादेवाच्या गाभाऱ्यात तर आसरा मिळणार..म्हणत ते मंदिरात घुसणार इतक्यात शेकडो वटवाघळे एकाच वेळी मंदिराच्या बाहेर पडली.
चौघांनी डोळे बंद करून डोळ्यासमोर हात ठेवत मागे पाय घेतले पण तितक्यात सर्व वटवाघळे उडून गेली....!
त्यामन्दिरात चौघे जाऊ लागले..पूर्ण अंधारात असलेल्या त्यामन्दिरात थोड्याच अंतरावर आत निरंजनाचा प्रकाश दिसला...!
चौघांनी डोळे विस्फारले...अंगावर काटे आले आणि भीतीने गागारुन गेले ...अरे इतक्या पडक्या मंदिरात निरंजन लावायला कोण आले .असा प्रश्न पडून ते धावत मागे पळणार इतक्यात बाहेर धो धो पाऊस सुरु झाला होता....आता मंदिराच्या आत प्रवेश करुन काय प्रकार आहे हे पाहिल्याशिवाय पर्याय नव्हता....!
धीर धरुन ते आत आत सरकू लागले...धूप ,अत्तराचा सुगंध आणि निरंजनांच्या सोनेरी प्रकाशात महादेवाचे शिवलिंग झळाळत होते आणि उजव्या अंगाला एक जातीवन्त कुळवंत स्त्री फुलांची माळ करण्यात व्यस्त होती.....!
चौघांची भिवये वर झाली...पडके मन्दिर,वटवाघळे आणि आत इतकी सुंदर आरास करणारी हि बाई कोण ?
मल्हारी ची बोबडी वळण्याचा मार्गावर होती,त्याने सखाराम चा हात घट्ट पकडला.....!

क्षण दोन क्षण...त्या स्त्री चे लक्ष दरवाज्या कडे गेले आणि तिने खुंटी ला अडकवून ठेवलेली तलवार उपसून अंधारात लपलेल्या त्या चौघांच्यावर तलवार रोखत लढाईचा पवित्रा घेत बोलली....कोण आहे दरवाज्यात...सरळ पुढं या नाहीतर खांडोळी करीन.....!

●●◆•••••••••●●•••••••••◆●●
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या



"बाजींद"


भाग 5 वा

●●◆•••••••••●●•••••••••◆●●
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
•••••••••••••••••••••••••••••••

आभाळातून वीज चमकावी तशी त्या स्त्री च्या एकाकी आव्हानाने सखाराम व त्याचे मित्र पुरते गांगारुन गेले.

धीर धरुन सखाराम एक पाऊल पुढे आला व बोलू लागला....

"आमी धनगरवाडी चे गावकारभारी हाओत,रायगडावर निघालोय,पावसाचा जोर वाढला म्हणून निवारऱ्याला हिकडं आलो..."

"खोटं नगा बोलू..नायतर एकेकांची खांडोळी करीन... इकडं कोणीही फिरकू शकत नाही,बिकट चोरवाट फक्त हेरांना ठाऊक आहे याची..."
ती स्त्री बोलली...!

नारायण बोलला...महादेवाची आण घेऊन सांगतो,आम्ही स्वताहून हिकडं नाय आलो...त्यो खंडोजी म्हणून एकजण भेटला,महाराजांचा हेर आहे म्हणून सांगत होता..."

काय ..?
खंडोजी ...कुठं भेटला तो तुम्हाला ?
स्त्री उदगारली....!

मग,घडलेली सारी हकीकत व ज्या कारणाने ते चौघे रायगड वर निघालेत ते त्यांनी त्या स्त्रीला सांगितले.

चौघांची कथा ऐकून त्या स्त्री ने तलवार खाली केली आणि चौघांना आत या म्हणून खुणावले...!

चौघेही आत आली...जवळच एका मडक्यात पाणी होते,ते घेऊन त्या स्त्री ने चौघांना दिले..!

सारे जण पाणी पिऊ लागले,आणि मल्हारी ने जड शब्दात त्या स्त्री ला प्रश्न केला....ताई,एवढया भयंकार जंगलात,या पडक्या देवळात,या असल्या जीवघेण्या पावसात तुम्ही एकल्या कशा ?
कोण हाय तुम्ही?

किंचित स्मितहास्य करत ती बोलू लागली.....
मला साऊ म्हणतात.....महाड चे सरदार शिर्के यांची मी मुलगी...!
आमचे वडील आदिलशाही चे सरदार.
शिवाजीराजांनी रायगड जिंकला आणि आसपास चे सारे आदिलशाहीचे सरदार त्यांना मिळाले,फक्त आमचे वडील सोडून...पण...शेवटी त्यांनी पण महाराजांना साथ द्यायचे ठरवले...हम्म.. खूप मोठी कथा आहे दादा...वेळ आली की सांगीन...!

पण,खंडोजी तुम्हाला कुठं भेटला...?
आणि,तो कसा आला नाही इकडे...त्यालाच तर शोधायला मी इथवर आली आहे...!

काय ?
त्याला शोधायला...सर्जा बोलला..!
अहो,तो आम्हाला चोरवाट दाखवतो म्हणून हिकडं घेऊन आला आणि स्वता गायब झाला...कुठं आणि कसा गेला काय माहिती...आमाला फकस्त या रात्री हित आसरा द्या...सकाळी येरवाळी आमी आल्या पावली निघून जाऊ..."

का ?
साऊ बोलली...अहो,आजवर कोणालाच आम्हाला मदत करता आली नाय,खंडोजी आणि आम्ही सारे या जंगलात खूप दिवसापासून दबा धरून आहोत...तुमची मदत करायला आम्हाला आवडेल...इथून फक्त 10 कोसावर माझ्या वडिलांची फौज आहे,तिथं आपण जाऊया...माझे आबा तुम्हाला मदत करतील...त्यांचा आणि महाराजांचा संबंध खुप जवळचा आहे....मी नेईन सकाळी गुप्त वाटेने तिकडे...तोवर तुम्ही विश्रांती घ्या....मी जरा बाहेर जाऊन येते...!

सखाराम व त्याचे मित्र खूप आनंदले....चला खंडेरायाची कृपा...आता तर सरळ शिर्के सरदार आपल्याला मदत करणार म्हणल्यावर काम झालं....गाव आणी बारा वाड्याच दुःख कायमच संपलं... चला घ्या दर्शन देवाचं आणि झोपा...."

सर्जा,नारायण आणि मल्हारी त्वरित झोपी गेले.
दिवसभर खूप हाल झाले होते त्यांचे...पण मल्हारी ...?

त्याला बिलकुल झोप येईना...उलट त्याची विचारचक्रे सुरु झाली होती....!

कोण ह्यो खंडोजी...हे जंगल या आधी आम्हाला का नजरेस पडले नाही,हे मन्दिर जर एवढे पुरातन आहे,तर मग शिवाजी महाराजांसारखा शिवभक्त राजा आजवर इथं येऊन या मंदिराची डागडुजी का केली नाही?

तारुण्याने मुसमुसलेली ही सौंदर्यवाण साऊ इतक्या भीषण काळरात्री एकटी इथं काय करते आहे ?
आणि शिरक्यांची फौज 10 कोसावर ?
10 कोसावर तर नुसतं जंगलच आहे....फौज कशी आणि कुठे असेल....!

हे विचार चक्रे चालू असतानाच मंदिरा बाहेर एक जीवघेणी वाघाची डरकाळी सखाराम च्या कानावर पडली आणि दचकून तो उठला...आसपास पहिले पण ते तिघे तर घोरत होते...हिम्मत करुन त्याने त्या खुंटीवर असलेली तलवार घेतली आणि समोर असलेल्या महादेवाच्या पिंडाला नमस्कार करत मनात प्रार्थना केली...."माझ्या देवा...गावासाठी आम्ही जीवावरचा खेळ खेळतोय,तू काय पदरात टाकशील ते खर,फकस्त आमच्या हातून काय चूक होऊ देऊ नगो,तुझा आशीर्वाद नेहमी पाठीशी असावा"

सखाराम तडक मागे फिरला आणि त्या निमुळत्या मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर निघाला....बाहेर निळसर चांदणे पडले होते,पाऊस बिलकुल नव्हता,झाडांच्या पानावरुन निथळणारे पाणी चेहऱ्यावर झेलत तो बाहेर आला,व वाघाच्या आवाजाचा कानोसा घेत,तो पुढे गेला व पाहतो तर काय ?
वाघाचे ते भयानक धूड रक्ताच्या थारोळ्यात निपचिप मरुन पडले होते......तो त्या वाघाकडे निरखून पाहू लागला,त्याच्या हृदयाची कम्पने वाढली,जो हळू हळू मागे जाणार इतक्यात...पाठीमागून त्याच्या पाठीवर कोणीतरी कोणीतरी हात ठेवला...."

जिवाच्या आकांताने तो ओरडला आणि मागे वळून पाहतो,तर ती साऊ होती...!

दीर्घ श्वास घेत त्याने तिच्याकडे नजर टाकली आणि म्हणाला...खर सांगा बाईसाहेब तुम्ही कोण आहे ?
ह्या वाघाला कुणी मारलं ?
आम्ही गावासाठी हिकडं आलोय...तुम्ही कस काय ऐकलंच हित हाय ?

अस बोलताना भीतीने सखाराम चा घसा कोरडा पडला व अश्रू येऊ लागले..."

स्मितहास्य करत साऊ बोलली....घाबरु नका भाऊ....मी इथं कशी हे ऐकायचं आहे ना तुम्हाला...?

तर मग ऐका........!

मी "सावित्री येसाजीराव शिर्के"
आदिलशाहीचे नेकजात सरदार राजे येसाजीराव शिरक्याची एकुलती एक मुलगी.......लहानपनापासून हौस मौज करत वाढलेल्या माझ्या आयुष्याला कधी न संपणारे दुःख ज्या हरामखोराने दिले त्याच्यामुळेच मी आज इथे आहे......!

माझ्या साऱ्या जीवनाची कथा मी तुम्हाला सांगते....ऐका आणि मग विश्वास ठेवा न ठेवा तुमची मर्जी......!

"यशवंतमाची"हे माझे जन्म गाव...!

●•••••••●●◆◆●●••••••••••••
धन्यवाद

✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या




"बाजींद"


भाग क्र.६

〰〰〰〰〰〰〰〰
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
•••••••••••••••••••••••••••••••
सर्व गोष्टीत संपन्न असणाऱ्या गावात आणि असे गाव संपन्न बनवण्यासाठी पडेल तडजोड करायला प्रसंगी प्राणाची बाजी लावायला तयार असणाऱ्या शिर्के घराण्यात माझा जन्म झाला.

वडील "राजे येसजीराव शिर्के" आदिलशाही साम्राज्याचे नेकजात,निष्ठावान मनसबदार.
आमचे सारे घराणे विजापूर च्या गादीची इमाने इतबारे सेवा कित्येक पिढ्या करत होती..!
पण,पुण्याचे शिवाजीराजे भोसले यांनी "हिंदवी स्वराज्याचा" डाव मांडला आणि केवळ आदिलशाही नव्हे तर हिंदुस्थानातील पाची पातशाह्या हादरुन गेल्या.
अफझलखानासारखा बलाढ्य सरदार फाडून जावळी पासून महाड पर्यंत असणारा जावळीच्या चंद्रराव मोर्यांचा प्रदेश एकहाती शिवाजी राजांनी जिंकला...केवळ आमची माची सोडून....!
वास्तविक आमच्याकडे लक्ष देण्याइतपत आमचे सैन्य जास्त नव्हते,पण आमचे वडील फार शूर,इमानी आणि एकनिष्ठ सेनानी म्हणून पंचक्रोशीत नाव होते,
दुसरी गोष्ट तळकोकणात सर्व हालचाली वर सहज लक्ष ठेवता येईल असे मोक्याचे ठिकाण म्हणजे "यशवंतमाची"...!
शिवाजी महाराजांच्या धाकाने आसपास ची कित्येक बलाढ्य घराणी शिवाजीराजांचा कौल घेऊन स्वराज्यात सामील झाली,फक्त आमचे घराणे सोडून....!
बस्स...हिच गोष्ट आमच्या घराण्याच्या नाशाला कारणीभूत ठरली...!
आमच्या वडिलांची फौज फार शूर व चिवट होती.
कुस्ती,तलवार,भाला, दांडपट्टा,घोडा या सर्वांचे प्रशिक्षण आमच्या वाड्यातच मिळत असे..!
आमच्या गावच्या "काळभैरव" यात्रेला कुस्तीचा फार मोठा आखाडा भरत असे.

त्यादिवशी पण गावाच्या यात्राचा फार मोठा आखाडा भरला होता ......

"राजे येसाजीराव शिर्के" यांनी अनेक मल्लांना आश्रय दिला होता.महाराष्ट्रातील एक एक तगडे मल्ल त्यांच्या तालमीत सराव करत होते.
बदाम,काजू,खारीक,सुके फळे यासह अनेक खुराकाचे पदार्थ दर महिन्याला बैलगाड्या भरून भरून तालमीत येत असे.
स्वता येसाजीराव कुस्ती मेहनत खूप करत असत.
पंचक्रोशीतील एखाद्या मैदानात चांगला लढवय्या मल्ल दिसला कि त्याच्या सार्या आयुष्याची जबाबदारी घेऊन त्याला सांभाळत असे.
असे आमचे शिर्के घराणे कुस्तीचे फार नादिष्ट्य..!
काळभैरवाच्या यात्रेत महाराष्ट्रातील अनेक मल्ल कुस्ती खेळायला येत असत.मोठमोठ्या बक्षिसांच्या रकमा,खुराकाचे साहित्य,तलवार,घोडा अशी बक्षिसे मिळवून परत जात असे.
पंचक्रोशीतील लाखो लोक त्या कुस्त्या पहायला बैलगाड्या जुंपून,घोड्यावरून,पालखीतून,पायी येत असत.
त्यांच्या जेवणा खाण्यापासून ते मुक्कामाची सोय सारे "राजे येसाजीराव शिर्के" करत असे.

शिवाजी महाराज आणि आदिलशाही चे राजकारण वेगळे आणि हा कुस्त्यांचा फड वेगळा असे समजून अनेक शिवशाहीचे सरदार सुध्दा या मैदानाला आवर्जून हजर असे.
त्या दिवशी सुध्दा असाच माणसांचा लोंढा यशवंतमाची ला पडला.
हशम हत्यारे पेलून येसाजीरावांच्या फौज्या चहू बाजूनी गस्त घालून संरक्षण करताच होत्या.
अनेक पैलवान हातात बर्चे भाले पेलून जंगलात तळ ठोकून येणाऱ्या पाहुण्यात कोणी शत्रू तर नाही याची दाखल घेत होते .....चिलट सुध्दा राजे येसाजीरावांच्या परवानगी शिवाय आत येणार नाही अशी संरक्षण व्यवस्था होती ,आणि जर आलेच तर त्याची खांडोळी करायचे आदेश होते.

दुपारी सूर्य मध्यावर आला आणि पश्चिमेकडे झुकू लागला आणि ‘काळभैरवाच्या नावान चांगभल’ च्या आरोळीने आसमंत दुमदुमून गेला.
लाखो लोकांनी यशवंतमाचीच्या काळभैरव डोंगराच्या खाली तयार केलेल्या कुस्ती मैदानाला कडे करायला सुरवात केली.
अनेक गावाचे,अनेक नावाचे ,अनेक पदांचे सरदार ते दंगल पहायला आले होते.अनेक वस्ताद- खलिफा आपापले पठ्ठे या मैदानात लढवायला घेऊन आले होते.
एव्हाना हलगी घुमक्याच्या ,शिंग तुताऱ्याच्या निनादात दांडपट्टा,लाठीकाठी चा खेळ मैदानात सुरु झाला.
अनेक वीर आपले कसब दाखवत होते ,आणि एखादा धारकरी आवडला कि उपस्थित प्रेक्षकातील एखादा "विजापुरी सरदार"त्याला मागेल तेव्हडे धन देऊन आपल्या पदरी येण्यासाठी व्यवहार करत असे..!
असे एक ना अनेक धारकरी आपल्या कर्तुत्वावर अनेक सरदार लोकांचे मांडलिक झाले ,अजूनही होत होते.
मर्दानी शस्त्रांचा खेळ संपून लहान मोठ्या कुस्त्याना प्रारंभ झाला ,महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले अनेक मल्ल आपले कसब दाखवून उपस्थित धनाढ्य लोकांच्याकडून आणि खुद्द येसाजीरावांच्या खजिन्यातून रोख बक्षीस जिंकत होते ...!
सूर्य मावळतीला झुकणार इतक्यात राजे येसाजी शिर्के यांच्या खास तालमीत तयार केलेला "भीमा जाधव" हा लढवय्या मल्ल लांघ-लंगोट चढवून अंगाला तेल लावून मैदानात ‘’जय बजरंगाची’’ आरोळी ठोकून उतरला.त्याच्या शड्डूच्या घुणत्काराने सार्या मैदानाच्या कानठीळ्या बसल्या..!
सारेच त्याची शरीरयष्टी पाहून थक्क झाले.
शे-दीडशे किलोचा तो भीमा नावाप्रमाणे भीम भासत होता.कल्लेदार मिशा.काळाकिभिन्न दिसणारा भीमा हा पैलवान नव्हे तर प्रतिस्पर्ध्याचा यमदूत आहे असे वाटत होते.
अनेक ठेकेदार भीमावर रोख रकमा,सोने चांदी,तलवार ढाली,बैलजोड्या,घोडे,गदा.यासःह हिरे मोती सुध्दा बक्षीस लाऊ लागली,
बक्षिसांचा आकडा चांगलाच फुगला तरीपण उपस्थित वस्ताद,खलिफा खाली मान घालून उभे होते.
भीमाला जोड काही मिळेना.
कशी मिळणार जोड ?अहो त्या भिमाशी लढणे म्हणजे साक्षात मृत्यूशी लढणे होय.कधी काय मोडून टाकल नेम नाही....!
राजे येसाजी उठले आणि मोठ्या रवात बोलू लागले......!
माझ्या भिमाशी चार हात करायला महाराष्ट्रात कोणी नाही ?
वऱ्हाड,खानदेश,कृष्णाकाठ,देश,कोकण सारे इथे जमले आहेत.कोणाच्याही तालमीत नाही का एखादा सुरमा मल्ल ?
आणि नसेल त्याला जोड तर मानाने त्याला बक्षीस देऊन सर्वांनी मान्य करा कि राजे येसाजींच्या पदराचा मल्ल महाराष्ट्रात अजिंक्य आहे ...!
पूर्वेकडून हलगी,घुमके,शिंग तुताऱ्या कल्लोळ करू लागल्या...लाखांची गर्दी कुजबुजू लागली...!
सर्व बक्षीस एका हारकार्याने एका पोत्यात फिरून गोळा करून मैदानाच्या मधोमध आणले..स्वता राजे येसाजीनी ५ शेर वजनाचे सोन्याचे कडे भीमाला बक्षीस देऊ केले ...ते मनोमन खुश होते...!

भीमा बेजोड मल्ल म्हणून विजयी ठरणार होता.

पण...पण तितक्यात मैदानाच्या उजव्या अंगाकडून एका गंभीर आवाजाने मैदानात शांतता पसरली...!
‘थांबा.....’
माझा पठ्ठा लढेल भिमाशी तुमच्या....!

कोण ?..

एकाने विचारपूस करून ठावठीकाणा माहिती आणली...!

गुंजनमावळातील शिळमकर देशमुख सरदारांच्या पदरी असणारा एक लढवय्या मल्ल खंडेराव सरदेसाई आणि त्याचे वस्ताद काकासाहेब जेधे आले आहेत..!
दोन्ही वस्ताद पैलवानांचे गुळ पाणी देऊन स्वागत झाले आणि कपडे काढून राजे येसाजीना मुजरा करून तो मल्ल मैदानात आला....!

घोटीव,पिळदार शरीर...मजबूत मांड्या,बलाढ्य बाहू....ओठावर किंचित काळी रेघ आणि स्मितहास्य..गोरापान नितळ चेहरा,सरळ सळसळीत नाक ....आणि पायात काळा दोरा बांधलेला खंडेराय सहीसही साक्षात "मल्हारी मार्तंड" वाटत होता..!
त्याच्या देखणेपणा आणि शरीराचे कौतुक गर्दीत होऊ लागले...!

एक मुठी माती त्याने हातात घेऊन कपाळाला लावली....आणि राजे येसाजींच्या कडे पाहत प्रचंड शड्डू ठोकला...सारे मैदान हादरले......!
मान्यवरांच्या हस्ते हातसलामी झडली ...आणि काही क्षण भूतकाळात जमा झाले..!

भीमा आणि खंडेराय यांची कुस्ती म्हणजे जणू दोन वादळे एकमेकांशी भिडणार होती.
निकाल काय होईल याचा अंदाज बंधने मुश्कील होते..!
भीमा-आणि खंडेराय मनगटाला मनगटे भिडली...गर्दनखेच सुरु झाली..!

बघता बघता मैदानांत डावांची वलये सुरु झाली
भीमाने वर्षभर कसून तयारी केलेला एक एक डाव खंडेरायावर मारत होता,आणि त्याची सहजच उकल करत खंडेराय सुटत होता...दोन्ही मल्ल चिखलाने माखले..!

कुस्तीचे पारडे कधी भीमा तर कधी खंडेराय च्या बाजूला झुकत होते.

भीमा एखाद्या भरपावसात भिजत उभा असलेल्या बुरूजासारखा वाटत होता तर खंडेराय गोऱ्या रंगावर तांबड्या मातीच्या चिखलाने केशरी आंब्याप्रमाणे भासत होता ...!

आणि ,
आता मात्र खंडेरायाने आक्रमक पवित्रा घेतला आणि भीमा चा उजवा हात बगलेत दाबून "आतली टांग" डाव इतक्या जोरात मारला आणि अक्षरश सुदर्शन चक्र फिरावे तसे भीमा गर्दीशी फिरून मैदानावर आडवा झाला.....सपशेल चीतपट कुस्ती...!

सारे प्रेक्षक आनंदाने बेभान झाले ....खंडेरायाला डोक्यावर घेऊन सारे लोक आनंदाने नाचू लागले.
हे सर्व पाहत राजे येसाजी उठले....शेजारी उभे असलेल्या कारभार्याला बोलले...या पोराला आणि त्याच्या वस्तादाला घेऊन वाड्यावर या....असे म्हणत राजे निघून गेले....!
खंडेराय गळ्यात फुलांच्या माळा,गुलाल आणि रोख बक्षिसात न्हावून गेला ....!

सर्व जण बेभान आनंदात होते...पण खंडेरायाची गूढ नजर मात्र वेगळीच भाषा बोलत होती...चेहऱ्यावर एकप्रकारची गंभीर शांतता दिसत होती......!
सारे लोक आनंदात होते....फक्त राजे येसाजीराव मात्र मनस्वी दुखी.
आजवर त्यांच्या गावात येऊन खुद्द राजांच्या मल्लाच्या छातीवर बसून विजयी आरोळी ठोकणारा खंडेराय त्यांच्या नजरेसमोरून हटत नव्हता..........त्याना ओढ होती त्यांच्या भेटीची...आणि खंडेरायाला ओढ होती...’यशवंतमाचीची’...?

धन्यवाद
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या